Apr 16 2026
|
05:36:51pm

संतभूमी रक्षणार्थ केले आम्ही आवाहन सत्य ! ध्येयी आमुच्या एकनिष्ठ जे धन्य तेचि अमर्त्य !! - श्री. मधुसूदन पाटील महाराज

संतभूमी संरक्षक संघर्ष समिती

   संतभूमी संरक्षक संघर्ष समिती ही पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि संतपरंपरेशी निगडित सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी कार्यरत असलेली लोकचळवळ आहे. युनेस्कोने जागतिक पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील पश्चिम घाटाचा “इको-सेन्सिटिव्ह झोन” म्हणून जागतिक वारशाच्या निकषांत समावेश करण्याची शिफारस केल्यानंतर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने तशी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत वनसंपदा, जैवविविधता तसेच भूगर्भीय व प्रस्तरशिल्पयुक्त स्थळांचे संरक्षण अपेक्षित होते.

   तथापि, सह्याद्री पर्वतरांगांचा अविभाज्य भाग असलेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी — श्री क्षेत्र भंडारा, भामचंद्र आणि घोऱ्हाडेश्वर डोंगर — या इको-सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येते. ही स्थळे केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची नसून, ती दुर्मिळ वनस्पती, पक्षी व जैवविविधतेने नटलेली नैसर्गिक परिसंस्था आहेत. याच भूमीतून संत तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे” या अभंगाद्वारे मानव आणि निसर्ग यांच्यातील सहजीवनाचा संदेश दिला.

   शाश्वत विकासाच्या संकल्पनेनुसार विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखणे आवश्यक असताना, या तपोभूमीला संरक्षणातून वगळणे हे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि नैतिकदृष्ट्या प्रश्न निर्माण करणारे आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या मते, या भागाचे संरक्षण म्हणजे केवळ निसर्गाचे रक्षण नव्हे, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टीचा वारसा जपणे होय.

आंदोलना विषयी थोडक्यात

सुमारे ७०० वर्षे चालत आलेल्या संत-पाईकांच्या या श्रेष्ठ संस्कृतीचे जतन करून संतांची या वारीतून प्रकाशीत होणारी समता व वैश्विक मानवतावाद तसेच संत संस्कृतीने निर्माण केलेला समृद्ध भक्तीसंप्रदायाचा समताप्रधान वारसा अबाधित ठेवण्यासाठी व भंडारा-भामचंद्र डोंगर संरक्षणासाठी "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" लढत आहे.

अधिक माहिती...

सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले भंडारा व भांमचंद्र डोंगर हे केंद्रशासित घोऱ्हाडेश्वर डोंगराप्रमाणे जतन करणे आवश्यक आहे. - राष्ट्रीय नेते मा.प्रकाशजी आंबेडकर

जगाला पर्यावरणाचा पहिला संदेश देणाऱ्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वनश्रीयुक्त श्रीक्षेत्र भंडारा आणि भामचंद्र डोंगर "इको सेन्सेटिव्ह झोन" मध्ये समाविष्ट करणे इष्ट आहे.
- प्राचार्य शिंदे , संचालक
(डेक्कन कॉलेज पुरातत्व विभाग, पुणे).