संस्थापक, संतभूमी संरक्षक संघर्ष समिती.
संतभूमी संरक्षक संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष श्री तुकयाभक्त मधुसूदन महाराज यांची जन्मभूमी सावर्डे बु॥, ता.कागल, जिल्हा कोल्हापूर असून सन १९६४ मध्ये त्यांचा जन्म एका संस्कारक्षम मराठी शेतकरी कुटुंबामध्ये झाला. स्वभावत:च त्यांच्या अंत:करणात भक्तिभावाचे प्राबल्य असल्याने ईश्वरी कृपेने बालपणी संतसंगती लाभली. सत्संगामुळे निर्माण झालेल्या विवेकासहीत वैराग्याच्या ज्ञान-निर्धाराने संत तुकोबांच्या कार्यासाठीच आपले जीवन आहे ही खूणगाठ त्यांनी शालेय जीवनात बांधली. मधुसूदन महाराज सन १९८५ मध्ये सर्वस्व त्यागपूर्वक तुकोबांच्या चरणी जीवन समर्पित करून पुणे जिल्हा ता.खेड, मावळ मधील संत तुकाराम महाराजांच्या ध्यान साधनेने शुचिर्भूत झालेल्या व वनश्री पर्यावरणाने परिपूर्ण असलेल्या श्रीक्षेत्र देहू जवळील भंडारा भामचंद्र डोंगराच्या एकांतात आले.
प्रथम एक वर्ष भंडारा डोंगरातील गुफेत तुकोबांच्या चिंतनात राहिले. नंतर त्याहूनही एकांत असणारा भामगिरी पर्वत निरंतरच्या वास्तव्यासाठी निवडला, इथेच त्यांनी संतश्रेष्ठ तुकोबांचे कृपावैभव अनुभवले. भामगिरीच्या पावन नितांत निवांत एकांतात गाथा-ज्ञानेश्वरी-भागवत आदी ग्रंथांच्या चिंतनात, संत वांड्मय संशोधन आणि लोकप्रबोधनात असा काळ चालला असतानाच तुकोबांची हि दिव्य तपोभूमी म्हणजेच भंडारा आणि भामचंद्र डोंगर सन २००६-०७ मध्ये काही स्वार्थी लोकांकडून पर्यटन व औद्योगिक विकासाच्या नावाखाली तसेच एम.आय.डी.सी. व खाणीसाठी उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु झाले. हे विध्वंसक काम मधुसूदन महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण आंदोलनाद्वारे "झुंजार ते एक विष्णूदास जगी" या तुकोबांच्या अभंगप्रेरणेनेतून वेळोवेळी थांबविले.
दोन्ही डोंगर शासनाने कायमस्वरूपी संरक्षित करावेत म्हणून सरकार दरबारी तसा अभ्यासयुक्त प्रस्ताव सादर केला त्याचा अविरतपणे पाठपुरावा चालू असताना या संकटाबरोबरच याच कालखंडात शासनाद्वारे या दोन्ही डोंगरांच्या मध्यावर शिंदेगाव येथे युनियन कार्बाईड नावाची "डाऊ" ही रासायनिक कुप्रसिद्ध अमेरीकन कंपनी सुरु झाली. ती हटवून हे संतक्षेत्र वाचविण्यासाठी वारकरी संप्रदायाद्वारे तीव्र आंदोलन छेडले. त्यामध्ये मधुसूदन महाराजांनी स्वत:ला झोकून देऊन संघर्ष केला व "डाऊ" ला माघार घेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्याने आंदोलनास थोडेबहुत यशही प्राप्त झाले. पुढे आंदोलनाचे सातत्य वैयक्तिक पातळीवर महाराजांनी चालू ठेवले. सन २०१० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक आगळी वेगळी क्रांतीकारी भुमिका घेऊन शासनाच्या सांस्कृतीक विभागास तुकोबांचे भंडारा व भामचंद्र डोंगर संपूर्णपणे पायथ्यापर्यंत "राज्य संरक्षित स्मारक" म्हणून घोषित करण्यास भाग पाडले.
भंडारा-भामचंद्र डोंगरांची प्राचीन ध्यानकेंद्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी ध्यानात घेता संत तुकोबारायांनी ज्या हेतूने या डोंगरांची साधनेसाठी निवड केली त्या एकांताचे स्वरूप कायम रहावे ही भूमीका घेऊन अध्यात्मिक साधकांसाठी एकमेव आश्रयस्थान असलेले संतश्रेष्ठ श्री तुकोबांचे हे साक्षात्त्कार तपोभूमी डोंगर कसे वाचतील यासाठी त्यांच्या चित्ताची तळमळ सुरु असून त्यासाठी मधुसूदन महाराज गेल्या १२ वर्षापासून परिसरातील भाविकलोक, वर्तमानपत्रे, सुहृदय सज्जन व्यक्ती व शासनाचे संबंधित विभाग यांच्याशी सतत संपर्क साधून हा प्रश्न ऐरणीवर आणत आलेले आहेत. हे पवित्र कार्य करीत असताना या तपोभूमीविषयक अपार कष्टाने संपादीलेले ऐतिहासिक दस्तावेज व त्यांचे स्वयंस्फूर्त वांड्मय लिखाण सन २००९ मध्ये पेटवणे, सन २०११ मध्ये त्यांच्यावर प्राणांतिक हल्ला करणे, सन २०१५ मध्ये अपहरण करून, तुझा वैकुंठवासी तुकाराम करू ! अशी ठार मारण्याची गर्भीत धमकी देणे, आंदोलन कालखंडात त्यांच्यावर खोटया केसेस दाखल करणे इत्यादि अपराध शासक व संतभूमी विरोधकांनी करूनसुद्धा "मामनुस्मर युद्ध्य च ।" या भगवद्गिता वचनावर अभंगश्रद्धा ठेवून ते असत्यावर मात करीत आले आहेत.
तत्वत: मधुसूदन महाराज कोणत्याही अध्यात्मिक पंथ तथा राजकीय पक्ष यांच्या विचारसरणीशी बांधील नसतानाही केवळ संतभूमीवर असणाऱ्या अनन्य निष्ठेमुळे हे साधनापीठ डोंगर सुरक्षित रहावेत म्हणुन सर्वच अध्यात्मिक पंथ तथा राजकीय पक्षामधील अनेक चांगल्या लोकांनी "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती"ला पाठिंबा दिला आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथें मन क्रिडा करुं ॥. या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या प्रचितीवर आरुढ असूनही श्री मधुसूदन महाराज समर्पितपणे भंडारा-भामचंद्र डोंगरांच्या संरक्षणासाठी आवाज उठवत आहेत. जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबांची तपोभूमी संरक्षणासाठीच त्यांनी जणू येथे अधिष्ठान मांडले आहे. शासनाने इथे आणलेल्या संतभूमी विध्वंसक अमेरिकन रासायनिक "डाऊ" कंपनी विरोधात त्यांनी छेडलेल्या आंदोलनाला आपण सर्वांनी प्रकर्षाने पाठिंबा दिला. त्यांच्या आंदोलनाचा मुळ हेतू म्हणजे "भंडारा-भामचंद्र मुक्ती संघर्ष" हा होता तो पूर्ण सफल झाला नाही. मध्यंतर शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात लढाईसाठी आंदोलनातील आधारस्तंभ म्हणविणारे भंगले त्याचाच परिणाम म्हणून आज तुकोबांचे हे पवित्र डोंगर खंडीत होत आहेत.
(उजवीकडून पहिले).
यासाठीच शासनाविरोधात पुन्हा एकदा "भंडारा-भामचंद्र डोंगर तपोभूमी बचाव अभियान" आंदोलनाच्या या मधुसूदन महाराजांच्या आवाहनाला संतांचे खरे पाईक म्हणवून घेणाऱ्या सर्वांनी वेळीच पाठिंबा दिला नाही तर सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग संपन्न अशी संत तुकोबांची ही जागतिक अध्यात्मिक एकांतिक पवित्र ध्यान-साधना केंद्रे, ज्यांना प्राचिन ऐतिहासिक सांस्कृतीक पार्श्वभूमी लाभली, जिथे विश्वोद्धारक अभंगवाणी स्फूरली ती साक्षात्त्कार पवित्र अशी ही प्रेरणास्थळे बाधित-खंडीत होण्यास वेळ लागणार नाही !.
मधुसूदन महाराज हे एक अयाचित आनंदयात्रीक वारकरी असलेले त्यांच्याकडे आज धन, मानमराबत यापैकी कुठलीही गोष्ट नाही. पण ज्यांनी संतांच्या नावाखाली किर्तन-प्रवचनाद्वारे प्रचंड मानमराबत, पैसा व प्रसिद्धी मिळवली आहे त्यांनी ही संत तुकोबांची एकांतप्रिय साक्षात्त्कार तपोभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य नाही का ? हा प्रश्न महाराजांना पडलेला आहे. "डाऊ" आंदोलनात पुढे-पुढे करणारे स्वयंघोषीत संतवीर, वारकरी नेते आज गप्प का बसले आहेत ? संत साहित्यावर भरपूर लेखन करणारे साहित्यिक, पर्यावरणवादी या विषयावर का बोलत नाहीत ? संत तुकोबांचे वंशज भंडारा-भामचंद्र डोंगर "राज्य संरक्षित स्मारका" ला विरोध दर्शवून यावर मौन का बाळगतायत ? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणविणाऱ्या प्रसारमाध्यमांचे यावर धोरण काय आहे ?.
वरील पडलेले हे प्रश्न स्वत:पुरतेच मर्यादित न ठेवता सर्व जनता-जनार्दनासमोर किंबहुना वैश्विक पातळीवरही प्रकर्षाने मांडता यावेत म्हणून, "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" द्वारा मधुसूदन महाराजांचा सर्वत्र दौरा सुरु आहे. अशाप्रकारे वारकरी धर्माचा जिव्हाळा, प्राचीन सांस्कृतीक अस्मिता आणि एकांतीक तपोभूमी वारसा असलेल्या या संतभूमी भंडारा-भामचंद्र डोंगरांच्या संरक्षणासाठी आंदोलन माध्यमातून हा ऐतिहासिक संतपीठ स्थळांच्या जतनास्तव सत् आणि असत् मधील हा संघर्ष महाराजांनी सुरु केला आहे.
अशा प्रकारे "चिरंजीव पद पावावयासी । आन उपाय नाही साधकांसी । किंचित बोलू निश्चयेसी । कळावयासी साधका ॥" याच न्यायाने महाराजांचे हे कार्य अविरतपणे चालू असून "माझे काय जाईल जाण । मी बोलेन उत्तराई" किंवा "तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ॥" हि वचने सार्थ करण्यासाठीच मधुसूदन महाराज देहात उरले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही म्हणून सज्जनहो "ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनी अंत:करणे ..॥" या ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेल्या मनोभुमिकेनुसार हा विषय सर्वत्र प्रसारीत व्हावा म्हणून मधुसूधन महाराजांच्या मार्गदर्शन प्रेरणेने हे "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" च्या नावाने संकेतस्थळ सुरु करीत आहोत. यातून "वेढा रे वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातीरी ॥" असेच शासनाप्रती वर्तमानात घडावे व मधुसूदन महाराजांचा ध्येयवाद साकार व्हावा हिच प्रमाणिक अपेक्षा.