महाराष्ट्रातील पुणे जिल्हा खेड व मावळ तालुक्याचा बराच मोठा भाग औद्योगिकीकरणासाठी जाहीर झाला आहे, होत आहे. श्रीक्षेत्र भंडारा-भामचंद्र, देहू-आळंदी ही सांस्क्रुतीक व अध्यात्मिक पावन भूमी असलेल्या चाकण, तळेगाव परिसरात अनेक मोठ्या उद्योगांची उभारणी सुरु झाली आहे. वारकरी धर्म परंपरेचा फार मोठा उज्वल वारसा लाभलेल्या या परिसराची कृरपणे मोडतोड करून विटंबना चाललेली आहे. विशेषत: श्रीक्षेत्र भंडारा आणि भामचंद्र डोंगर व परिसरात हे संकट फार मोठे आहे. अगदी सुरुवातीपासून संतभूमीसह निसर्गाची होणारी हानी थांबवण्यासाठी याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न याच तपोभूमीतून मधुसूदन महाराजांकडून सातत्याने झाला आहे, होत आहे.
बहू एकांतावरी प्रिती । जया जनपदाची खंती । जाण मनुष्याकारे मुर्ती । ज्ञानाची तो ॥ ज्ञानदेवांच्या या ओवीनुसार असे एकांतावर प्रेम करणारे साधक जिथे राहतात, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांनी एकांतासाठी ज्या भंडारा, भामचंद्र आणि घोऱ्हाडेश्वर डोंगरांची निवड केली. या डोंगरांतर्गत भामचंद्र डोंगरावर त्यांना आत्मतत्वाचा साक्षात्त्कार झाल्याचे वर्णन "भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली । वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ॥" या अभंगातून महाराजांनी केले आहे. अशा प्रकारे महाराजांचे ध्यान-चिंतन तपोभूमी साठी प्रसिद्ध असणारे निसर्गरम्य, निरवशांतीप्रधान हे तिन्ही डोंगर आम्हा वारकऱ्यांना पवित्र हिमालया इतकेच प्रात:स्मरणीय व वंदनीय आहेत.
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास । ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ।। यासाठी "काळ सारावा चिंतने । एकांतवासी ..." ही अध्यात्मिक साधकांसाठी अनुकूलता व साधनेसाठी पूर्ण स्वातंत्र्य इथे असल्याने वारकरी साधक व चिंतकांच्या एकांतप्रिय अशा या पवित्र डोंगरांना खाणीसाठी सुरुंग लावून लचके तोडणाऱ्या व त्यांचे अस्तित्वच धोक्यात आणणाऱ्या लबाड, स्वार्थी प्रवृत्तीच्या तथाकथित नेत्यांचे, बिल्डर लॉबीचे नफ़ेखोर विकासाचे दुहेरी कारनामे निष्ठावंत वारकऱ्यांनी कसे सहन करावेत ! ही तुकोबारायांच्या तपोभूमीची प्रतारणा नाही काय ?
संत हे केवळ देवाचे देवपण सांगण्यासाठी अवतरत नाहीत, तर अखिल मनुष्य मात्रास देवत्वापर्यंतचा साज चढविण्यासाठी भक्ती-प्रेमयुक्त अध्यात्म ज्ञानाचा अविरत वर्षाव करीत आपले नियोजित जीवनकार्य पूर्ण करतात. वारकरी हा संतांचा, त्यांच्या विचारांचा व आचारांचा पाईक अर्थात खंदा शिपाई असतो. मग या संताच्या विचाराबरोबरच त्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या वस्तुंचा, वास्तुंचा व त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या स्थळांचा विध्वंस तो उघडया डोळ्याने कसा बरे पाहू शकेल ?
महाराष्ट्र शासनाने सन २००८ मध्ये एकीकडे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जन्मचतु:शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुर केला आणि विरोधाभास म्हणजे दुसरीकडे श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे पावित्र्य भंग करून बाजारू पर्यटन स्थळ बनवून तेथील साधकांचा एकांत संपुष्टात आणला तसेच श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराला एम.आय.डी.सी. व धनदांडग्यांच्या प्रस्तावित खाणीमुळे पावन भूमीपासून वंचित केले आणि येथूनच या संतपीठात त्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटली. हा संघर्ष चालू असतानाच त्यात आधिकाधिक भर म्हणून "डाऊ" ही कुप्रसिद्ध रासायनिक कंपनी या दोन्ही पवित्र डोंगरांच्या मध्यवर्ती शासनाने आणली.
वरील घटनेमुळे संत भूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या आम्हा वारकऱ्यांच्या ही बाब जिव्हारी लागली आणि त्यातूनच सन २००८ मध्ये व्यापक आंदोलनासाठी भामचंद्र डोंगर येथे श्री तुकयाभक्त मधुसूदन महाराजांनी "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" ची संस्थापना केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा व भामचंद्र डोंगर बचावासाठी संघर्ष सुरु झाला. यासाठी सनदशीर मार्गाने प्राणांतिक उपोषण, आंदोलने केली. अशा प्रकारे या आंदोलनाची तीव्र गंभीरता पाहून समितीच्या प्रस्तावावर शासनाच्या पुरातत्त्व व सांस्कृतीक कार्य विभागाला संविधानिक कायद्यानुसार श्रीक्षेत्र भामचंद्र व भंडारा डोंगर हे संत तुकोबांचे "राज्य संरक्षित स्मारक" म्हणून घोषित करण्यास भाग पडले.
संतभूमीत जमीन संपादिण्यास शेतकर्यांचा विरोध असतानाही डोंगर व पायथ्याच्या जमीनी एम.आय.डी.सी. ने व बिल्डर लॉबी ने कवडीमोलाने खरेदी करून संतांचे हे वास्तूवैभव, डोंगराची ऐतिहासिकता व पुरातन स्मारक हि वस्तुस्थिती नाकारून विकासाच्या नावाने "राज्य संरक्षित स्मारका" वर शासनाकडे हरकती घेतल्या. पुरातत्त्व व सांस्कृतीक कार्य विभाग पर्यायाने शासनावरही दबाव तंत्र टाकून डोंगर विध्वंसक अशा या धनदांडग्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व येथील ग्रामपंचायतींच्या खांद्यावर बंदुक ठेऊन सन २०११ मध्ये शासनाने दोन्ही डोंगरासंदर्भात घोषित केलेल्या मुळ न्याय्य "रा.सं.स्मा" वर अधिसूचनेवर हरकती घेऊन जे बदल करण्यास सुचविले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतीक विभागाने जसेच्या तसे स्विकारले तर मोठया अरिष्ट परिणामांचा धोका आहे "त्यामुळे महाराष्ट्राच्या संत संस्कृतीने निर्माण केलेला समृद्ध भक्तीसंप्रदायाचा समताप्रधान वारसा नष्ट होणार आहे".
एकांगी भौतिक विकासवाद्यांच्या वरील खोटया हरकती व खोटे ठराव शासनाने फेटाळले नाही तर कालांतराने देहू-आळंदी, भामचंद्र आणि भंडारा डोंगराच्या वारीला वारकरी आल्यानंतर येथे जो परिक्रमा करतो त्यावर आघात होऊन गेली "७०० वर्षे चालत आलेली संत-पाईकांची ही श्रेष्ठ सांस्कृतीक परंपरा त्यामुळे खंडित होऊन संतांची या वारीतून प्रकाशीत होणारी समता व वैश्विक मानवतावाद संपुष्टात येईल. वस्तुत: "एखादी श्रेष्ठ संस्कृती - परंपरा वा संतांचे तपोभूमी तीर्थस्थळ निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड लागतो पण त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी, त्याच्या विध्वंसासाठी अल्पसा काल सुद्धा पुरेसा ठरतो आणि एकदाका अशी उर्जा, प्रेरणास्थळे नष्ट झाली तर मानव आदर्शहीन बनून त्याचे नैतिक अध:पतन होते". इथे शासनाचे हे दुटप्पी कारस्थान आहे असे वाटते.
असे होऊ नये यासाठीच या तपोभूमी संतपीठ स्थळांच्या जतनास्तव हा संघर्ष १२ वर्षापासून चालला आहे. प्राचीन इतिहास लेणी संपन्न, संतभूमीची पार्श्वभूमी लाभलेला हा सर्व प्रदेश म्हणून येथील संत जीवनाशी निगडीत इतिहासाच्या खुणा जपणे आणि वारकरी विश्वधर्माच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण या परिसरात कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीत पुढील पिढीसाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक हा आदर्श वारसा संस्कृतीच्या अभ्यासासाठी गरजेचा आहे याची जाणीव ठेवणे शासनाचेच आद्य कर्तव्य आहे.
सत्ता संपत्तीच्या उन्मादामुळे शासन-राज्यकर्ते आणि भांडवलदार लाभार्थी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यास्तव संतभूमी रक्षणार्थ संत तुकोबांचा अविष्कार असे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्वातंत्र्य कालखंडातील आदर्श घेऊन सर्वांनी हा लढा व्यापक करण्याची गरज कालौघात निर्माण झाली आहे. याच व्यापक लढयाच्या हेतूने "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" कार्य करीत आहे.
तरी या वरील स्पष्ट निवेदनातून तुकोबांच्या पवित्र तीर्थक्षेत्र तपोभूमी पर्वतावर होणारा अन्याय, अतिक्रमण व विध्वंसाची भयावहता आपल्या लक्षात आली असेलच ! त्यामुळे आपल्या सारख्या समर्थ लोकांनी "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" च्या पर्यावरण, वनश्री व संत संस्कृती रक्षणाच्या या पवित्र कार्यास पाठिंबा व समर्थन दिल्यास आम्ही श्री संतश्रेष्ठ तुकोबांच्या तपोभूमीचे निश्चित संरक्षण करू शकेन असा आम्हाला दृढ आत्मविश्वास आहे.